Sunday, July 25, 2021

कोक, पाटकर आणि क्रिकेट #सोमवारचाउपहास

 “कोक नको, फक्त पाणी दे....” वेटरला फर्मान देत त्याने पुढचा भरला.

लॉकडाऊन मुळे क्रिकेटच्या मॅचेस जवळ जवळ बंद झाल्या होत्या. त्यामुळे त्याची आर्थिक परिस्थिती फारच खालावली होती.
“मॅचेस नाहीत तर पैसा नाही. च्याआयला मग करायचं काय?” त्याने वैतागून क्रिकेटच्या देवालाच विचारले.
“हे पहा लक्षात ठेव.... खरा खेळाडू खेळावर फक्त श्रद्धा ठेवतो. तो पैसे कमविण्यासाठी कायमच इतर मार्ग वापरतो. जोड धंदे करतो.” देवाने खुलासा केला.
“म्हणजे काय करायचे?”
“क्रिकेट काही २४ तास नसते. त्यातून थोडा वेळ काढायचा आणि मिळेल ते विकायचे. मग आपोआप डकवर्थ लुईस च्या पलीकडे जाऊन गणिते जुळतात. मी हि तेच केले. क्रिकेटने जेव्हडे दिले त्यापेक्षा कित्येक पटींनी मी वेगवेगळ्या गोष्टी विकून पैसा कमविला.”
“तु तर देव... तुला काय पैशाचे कौतुक?” त्याने तोंडात फरसाण कोंबत विचारले.
“अरे नुसते देवत्व मिळून काय फायदा... उद्या इतर कोणी विराट पराक्रम केला तर हि भाबडी जनता त्याला देव मानतील. रिटायरमेंट ला समजत कि करिअर म्हणजे शेवटी किती पैसा कमविला इव्ह्डेच”

“देवा अरे तू तर मगाशी खेळावरची श्रद्धा वगैरे बोलत होतास...”
“श्रद्धा खेळावर आहेच रे... पण आता एव्हडा क्लायमेट चेंज झालाय कि देव असलो तरी एसी शिवाय आता बसवत नाही रे कुठे..... फिटनेस पाहिजे. तू काय करतो फिटनेस साठी?”
“रोज सकाळी उठल्यावर आधी एक लिटर पेप्सी पितो. पोट एकदम साफ होतय. आणि मग कोणत्यातरी क्लब वर जाऊन दे दना दे दन ठोकायच्या.... गप्पा... म्हणजे यामुळे मन प्रसन्न राहतंय. देवा, तुम्ही मन प्रसन्न ठेवण्यासाठी काय करता?”
“मी ब्रांडेड वस्तू वापरतो.... भारीतला टीव्ही, महागतला मोबाईल...”
“फक्त ब्रांडेड!! मजा आहे... पण सगळ्यांना कसं परवडणार?” त्यने पुढचा भरला.
“अरे आपण क्रेडीट कार्ड सुद्धा विकतो ना.....”
“काय सांगता? विकता? मग क्रिकेट चे काय?”
“अरे क्रिकेटवर श्रद्धा आहेच. पण इतर वेळी मार्जिन चांगले मिळाले कि मिळेल ते विकतो...”
“देवा पण... देवाने त्याची इमेज सांभाळून, त्याच्या दर्जाच्या, चांगल्या, समाजाचा फायदा होईल अशाच वस्तू विकल्या पाहिजेत ना....”
“हे बघ मी काय कोणाला फोर्स करत नाही कि यानीच दात घासा, हेच कपडे घाला, हाच विमा घ्या किंवा हाच मोबाईल, गाडी घ्या. तो तर माणसांचा चोईस असतो. त्याचा माझ्याशी काय सबंध”
“देवा, तुम्ही ज्या गोष्टी वापरत नाही त्या सुद्धा विकता ?”
“तू फारच आदर्शवादी होतोहेस... तुला आदर्श कोणाचे ठेवायचे ते तरी कळते का?”
“देवा तुम्हाला पाटकर माहिती आहेत ना?” त्याने चाचरतच विचारले.
“फारच विनोदी व्यक्तिमत्व.... उभ्या महाराष्ट्राला माहिती आहे... पाटकर म्हणजे हशा....फारच विनोदी आहे आयुष्य त्यांचं”
“काय सांगता... मला तर वाटल होत कि ती बाई म्हणजे.....”
“बाई? कोण बाई? विजय पाटकर आता बाई झालाय? कलियुगात काही खरे नाही. आता ऑक्सिजन परवडत नाहीरे. असो. तुला सांगतो आता करोना संपला... आता वातावरण पार बदलून गेलय, अजून बदलत जाईल... मग बघ सगळीकडे भरपूर काम आणि नुसता पैसा. मग काय ह्या पैशाचे करायचे काय?? ही माणसे आपलाच माल विकत घेतील आणि घरी जाऊन मॅचेस बघत बसतील...”
“खरे आहे देवा, क्रिकेटची नशाच वेगळी. त्याने माणूस सगळी टेन्शन विसरून जातो..... एकदा मॅच चालू झाली कि भूजल पातळी, बेसुमार पाणी उपसा, मरायला आलेल्या नद्या, बदललेला पाऊस, वाढलेले तापमान, प्रदूषण सगळ विसरून क्रिकेट मध्ये रमतोय बघा...”
“आणि एकदा क्रिकेट चालू झाले कि तू पैसा कमविणारच की....”
खुद्द देवानेच अशा दाखविल्यावर तो एकदम खुश झाला... त्याने घाईघाईत पुढचा भरला...
“अरे थांब घाई करू नकोस. देव मानतोस ना मला? मग ऐक जरा. अशी पाण्यातून पिऊ नकोस. आजकाल पाणी पुर्वीसारखे स्वच्छ नसते... जरा कोक किंवा पेप्सीतून पीत जा....”
त्याने देवाचे ऐकले. कोक मागविले. तो देवाचे ऐकणारच होता.
तो वयाने लहान, आणि ते मोठे असेल तरी दोघे एकाच अड्ड्यावरचे बुकी. तो शिष्य होता आणि तो त्यांना आपला गुरुच नाही तर क्रिकेट बेटिंग मधला देव मानत होता. क्रिकेटच्या विश्वात पैशासाठी रोज नवा ‘पण’ लावणारे ते दोन बुकी....... लोकांना नवी स्वप्ने विकणारे आज कोक पिऊन आनंद साजरा करत होते..
© स्वरूप गोडबोले.

No comments: