शेरनी, टायगर आणि लोकाश्रय
‘दैव देते आणि कर्म नेते’ या म्हणीचे एकदम ताजे उदाहरण म्हणजे अमित मासुरकर यांचा ‘शेरनी’ चित्रपट! विद्या बालन, विजय राज, ब्रिजेंद्र काला, इला अरुण, नीरज कबीर यांच्यासारखे कलाकार कामाला असताना चित्रपट रटाळ झालाय. आता या रटाळ चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर लोकाश्रय कसा मिळवून द्यायचा? म्हणून एक छोटी क्लुप्ती वापरली आहे.
बॉलीवूडचा, बॉक्स ऑफिसचा किंग सलमान खान यांचे सुपर-डुपर हिट सिनेमे ‘टायगर जिंदा है’, ‘एक था टायगर’ यांच्याशी नाते जोडायचा प्रयत्न केलाय. सलमान खान टायगर म्हणून विद्या बालन ‘शेरनी’. अन्यथा चित्रपटाचे नाव ‘शेरनी’ असण्याचे काहीच कारण नाही. पण ‘शेरनी’ टायगरच्या आसपास सुद्धा पोहचू शकत नाही आणि याचे मुख्य कारण म्हणजे कमकुवत कथानक. भारतीय प्रेक्षकाची दाद मिळेल अशा अनेक जागा
‘शेरनी’च्या कथेत नैसर्गिकपणे निर्माण झाल्या होत्या. मात्र लेखक-दिग्दर्शकाने फारच निराशाजनक कामगिरी
केलेली आहे. उदाहरण घ्यायचं म्हणजे नरभक्षक वाघिणीने पहिला बळी घेतल्यावर जेव्हा
forest ऑफिसर विद्या बालन तेथे पोहचते तेव्हा तिच्या आधीच लोकाश्रय असलेला एक लोकनेता
पोहोचलेला असतो. तो म्हणतो “सरकार ने क्या किया तो एक लेडी अपसर को भेजा है....”
इथे नैसर्गिकरित्या एक सिच्युएशन मिळाली होती. विद्याच्या तोंडी एखादा टाळ्यांचा
feminist संवाद देता आला असता. लेखकाला तो सुचला नसेल तर दिग्दर्शकाने ट्विटरवर
फक्त #feminism सर्च केले असते तरी एखादा उत्तम संवाद मिळाला असता. ते कष्ट घेतले
गेले नाहीत. विद्या यावर काहीही न बोलताच तो सीन संपतो. चित्रपटात अशा अनेक
हुकलेल्या जागा जाणवत राहतात.
मानव जातीला धोका बनलेल्या नरभक्षक वाघिणीसाठी उंदीर पकडायला वापरतात तसला पिंजरा वापरणारे मूर्ख अधिकारी यात दाखविले आहेत. अशावेळी जनतेच्या मदतीसाठी धावून येणारे शिकारी
पिंटू भय्या खर्या अर्थाने हिरो ठरू लागतात. आणि येथेच दिग्दर्शकाचा गोंधळ होतो. कदाचित सध्याच्या असहिष्णू वातावरणात सरकारी अधिकारी कसे चुकीचे आहेत हे ठळकपणे दाखवायचे नाही अशी निर्मात्याची इच्छा असू शकेल. एका सीनमध्ये जंगलाजवळ राहणाऱ्या आदिवासींचे जंगलावरचे अवलंबित्व कमी करण्याचे कारस्थान फोरेस्ट ऑफिसर रचत असतात. जेणेकरून आदिवासींना जंगलापासून तोडता येईल. पण यावर देखील प्रसंग निर्मिती करून सीन अर्धवटच सोडून देणेत आलेला आहे. यावर एकही angry young man/woman आवाज उठवत नाही. दरवर्षी लाखो झाडे लावण्याच्या सरकारच्या योजनेबाबत चित्रपट अर्धवटच माहिती देतो. संथ पुढे जाणारी कथा एका वळणावर between the words कॉमेंट करू पाहते की शेतीमुळे जंगलतोड होत आहे की काय? शेतकऱ्यांच्या देशात शेतकरी भरडला जात असताना, गेले अनेक महिने राजधानीत शेतकरी आंदोलन करत असताना शेतकरी विरोधी कॉमेंट मात्र होते. हे टाळायला पाहिजे होते.
मुळात नरभक्षक वाघांचे काय करायचे यावर लेखक-दिग्दर्शक ठाम नाहीत. डायनासोर
नष्ट झाल्याने काहीही बिघडले नाही. त्यामुळे माकडाचा माणूस होणेवर काहीही परिणाम
झालेला नाही. उद्या वाघ टिकवायचे म्हणून कोणाचे बळी देणार? वाघ, चित्ते, चिमण्या कमी
झाल्या म्हणून माणूस, त्याचे घर, त्याच्या गरजा, देशाचा विकास थांबवायचा का? विज्ञान
सुद्धा नैसर्गिक आहे आणि विज्ञानाची प्रगती सुद्धा नैसर्गिकच आहे. निसर्ग कि
विज्ञान असल्या हा उगाळून उगाळून जुना झालेला प्रश्न आहे. जात, धर्म, भाषा यामध्ये
न अडकता सर्व भारतीयांनी एकमताने आपल्या कृतीतून विज्ञानालाच स्वीकारले आहे.
उगाळून उगाळून बोरिंग झालेल्या विषयावर देखील उत्तम सिनेमा होवू शकतो आणि याची
शेकडो उदाहरणे आहेत. पण चित्रपट बनवताना प्रेक्षकांचा विचार करायला पाहिजे. टायगर
सिरीज मध्ये सलमान खानचे चित्रपट गाजतात याचे श्रेय सलमान खानला आहे तसेच याचे श्रेय
जाते ते त्यातील कथेचा वेग आणि संवाद. थिएटर मध्ये जेव्हा सलमान खान “शिकार तो सभी
करते है लेकीन टायगरसे बेहतर शिकार कोई नही करता” असले संवाद बोलतो तेव्हा अक्षरशः
टाळ्यांचा कडकडाट होतो. माणसे भारावून जातात. आणि इथेच चित्रपट जिंकतो.
प्रेक्षकांना संदेश (किंवा अगदी उपदेश) द्यायचा असेल तर त्यासाठी आधी प्रेक्षक
भारावून गेला पाहिजे, त्याच्या मनात खोलवर काहीतरी हलले पाहिजे, त्याच्या भावना
चाळवल्या गेल्या पाहिजेत. त्याशिवाय भारतीय माणूस प्रेरणा घेत नाही. पण एकदा का
त्याला इमोशनल अपील मिळाले कि मग तो मुद्दा उचलून धरायच्या त्याच्या स्पिरीटला तोड
नाही.
ज्याप्रमाणे प्रेक्षकांना आपलेसे करून घेण्यात चित्रपट कमी पडतो तसेच प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यात सुद्धा चित्रपट अयशस्वी होतो. मारामार्यांचे सीन नाहीत. मुठी वळाव्यात असा एकही देशभक्तीवर संवाद नाही. गुणगुणावे असे एकही गाणे नाही. ‘डर्टी पिक्चर’ फेम विद्या बालन मुख्य भूमिकेसाठी असताना तिच्या अभिनयाला, तिच्या सौंदर्याला न्याय देईल असा एकही सीन नाही. मग प्रेक्षकांनी ‘शेरनी’ बघायचा तरी का? भारतीय प्रेक्षक सुज्ञ आहे. त्याने आज पर्यंत योग्य ते सिनेमे हिट ठरवून त्यांना पैसे मिळवून दिले आहेत. कोणत्यातरी फेस्टिव्हलला सिनेमा दाखवून शंभर-दीडशे ओळखीच्या माणसांच्या टाळ्या घेवून ‘नैतिक विजय’ मिळाला तरी त्यास भारतीय समाजात स्थान नाही. प्रेक्षकांचा विचार केलेशिवाय ‘शेरनी’ कधीही टायगर होवू शकत नाही!
© स्वरूप गोडबोले
No comments:
Post a Comment