वय, गाणे आणि कलाकारी
छम छम करता है ये नशीला बदन... मला आजही आठवतंय कि मी हे गाणे गायले आणि टाळ्यांचा
कडकडाट झाला होता... एस एम एसेसचा अक्षरशः पाऊस पडला... मी... मी महाराष्ट्राची
क़्विन गायिका झाले. तेही वयाच्या केवळ सातव्या वर्षी. मला आठवतंय जेव्हा त्या
रिअलिटी शोच्या महाराष्ट्रभर ऑडीशन होत्या तेव्हा दहा हजाराच्या वर विद्यार्थी
सहभागी झाले होते. त्यातून २० निवडले गेले. आणि मग जनतेनी एस एम एस करून, करून मला
पहिला नंबर दिला. तेव्हा फायनलच्या आधी माझे आई, बाबा आणि गुरु मी फायनलला कोणते
गाणे गावे याबाबत माझ्या समोरच चर्चा करत होते. गुरूंचा सल्ला होता “पायल बाजे....”
तर बाबांना आशा भोसलेचे कोणतेही गाणे चालणार होते. आईचा मात्र भक्तीगीताचा आग्रह
होता. त्यांचे काही केल्या एकमत होईना. प्रत्येक जण त्याने निवडलेले कसे चांगले
आणि दुसरे कसे वाईट यावर ‘डेलीसोप’ वाद घालत होता. शेवटी त्यांनी मलाच विचारले “तुला
कोणते गायचे आहे?” मला काय कोणतेही चालले असते... पण मनातून आता मला त्यापैकी कोणतेच
गावेसे वाटत नव्हते. तेवढ्यात तेथे channel चा माणूस आला. त्याने सांगितले कि, “जास्त मेसेजेस हवे
असतील तर आयटम सॉंग गा... छम छम करता है” मी गायले. आणि पहिले आले.
तेव्हाच मी ठरविले, करिअरमध्ये
आई, बाबा, गुरु.. कोणीही काहीहि म्हणो शेवटी ऐकायचे ते फक्त channel वाल्याचे! रिअलिटी
शो मुळे मला माझी कलाकारी दाखवायची एवढी संधी मिळाली. वर्षानुवर्षे रियाझ करणाऱ्याच्या
नशिबात सुद्धा अशी संधी व कलाकारी असेलच असे नाही.
अलीकडेच माझे channel वर सकाळी गाणे
होते. मग आई भक्ती गीतांचा आग्रह करू लागली. सो मिडल क्लास! मी म्हणाले तिला “हे
बघ मुळात कलाकारांना वेळ-काळाच्या मर्यादा नसतात... आणि जमाना बदललाय.... आता पाहटे
झोपून उठणारे कमी आणि झोपायला जाणारे जास्त असतात”
आता मी मोठी
झाल्यावर एका लहान मुलांच्या रिअलिटी शो ला जज्ज म्हणून जाण्याचे channel मुळेच मला भाग्य लाभले. आता माझेही फेसबुक, ट्विटर
खाते असल्याने मी काही उपद्रवी आणि अरसिक माणसांच्या कमेंट्स वाचल्या. काय तर
म्हणे “लहान मुलीने आयटम सॉंग गाऊ नये...” रागच आला मला. मी एका गोंडस लहान मुलीचा
“ही पोरगी साजूक तुपातली.....” गातानाचा व्हीडीओ tweet करून पोस्ट केली की “सौंदर्य
आणि अश्लीलता पुरषाच्या नजरेत असते”
नाही तर काय. एव्हड्या
लहान मुलीला काय कळणारे त्या गाण्याचा अर्थ? आणि कलाकाराला वेळेचे, वयाचे आणि
खर्या अर्थाने “सामाजिक व्याकरणाचे” बंधन नसतेच! channel च्या कृपेने मी लहानपणीच ‘कलाकारी’ शिकले.
ज्यामुळे माझ्या आयुष्याला एक नवीन... अगदी चाकोरी बाहेरचे वळण मिळाले. आणि बरका..
यामुळे माझ्या बालपणावर काडीचाही परिणाम झाला नाही. उलट, मला आठवतय, मी रिअलिटी शो
जिंकला होता तेव्हापासून माझे सगळे मित्र मैत्रिणी माझ्याशी जास्तच प्रेमाने वागू-बोलू
लागले. मी बॉसच झाले. शाळेने देखील मला परीक्षा, गृहपाठ यामध्ये सांभाळून घेतले. आणि
मी गायचेच ठरविल्यामुळे गणित कच्चे राहिल्याने माझे काहीही बिघडले नाही.
आणि लहान मुलांनी आयटम सॉंग गायल्यावर संस्कृती वगैरे खराब होत नसतीये हं... म्हणे वयाची जाणीव असावी. आणि आम्हा बालकलाकारांवर टीका कोण करतंय तर घरातल्या टीव्हीवरचे channel घरच्यांना न बदलू देणारे वानप्रस्थाश्रमातील म्हातारे. अहो तुम्हाला या वयात channel सोडवत नाही आणि आम्हा बालकलाकारांना कशाला उपदेश देताय!
आज हे सगळे आठवले
कारण आज मी आईच्या आजीच्या माहेरी कोकणातल्या ह्या छोट्याशा गावात दत्त जयंतीच्या
कार्यक्रमाला गायन-सेवा करायची संधी मिळाली म्हणून आले होते. आज येथे देखील, खास लोक-आग्रहास्तव
मी सगळ्यांचे लाडके “छम छम करता है” गायले...आणि टाळ्यांचा कडकडाट झाला.
दिलेल्या संधीसाठी
मी मनोभावे दत्ताच्या पाया पडले. औदुंबराला प्रदिक्षिणा मारताना मनातून channel चे देखील आभार मानले.
© स्वरूप गोडबोले.
No comments:
Post a Comment