मी : मीराबाई... क्या बात है! आज संपूर्ण
देशाला तुझा अभिमान आहे. तुझे करिअर मधील यश पाहून आनंदाने, कौतुकाने तुझ्या आई
वडीलांचा ऊर आज भरून आला असणार.
ती : काहीही. कोण ती मीराबाई? आणि
ती किती कमवते? तिच्या आई वडिलांचा ऊर आणि bank balance अजून हालला सुद्धा नसेल.
मी : अरे Chanu Saikhom
Mirabai यांनी रौप्य पदक
जिंकून....
ती : ते माहितीये.. पण त्याचा
करिअरशी काय सबंध?
मी : म्हणजे? मणिपूर मधील दुर्गम
भागात राहून चुलीसाठी लाकडे गोळा करून आणणारी मुलगी आज जगभरात आपल्या देशाचे नाव
मोठे करत आहे... आज प्रत्येक भारतीयाच्या तोंडी तिचेच नाव आहे...
ती : ते काय? एकेकाळी विजय मल्ल्याचे सुद्धा होते.
मी : पण मीराबाइंचे नाव अभिमानाने घेतेले
जात आहे.
ती : काहीही! वेटलिफ्टिंगच्या हमालीला
आपण मुळात करिअर म्हणतच नाही. भारतात स्पोर्ट्स मध्ये यशस्वी करिअर करणे फारच
अवघड... किंबहुना होतच नाही. (पार्थिव पटेलला विचारा) आणि कोणामध्ये काय म्हणतात ते talent कि काय ते
सापडलंच तर लोकं तोंडावर ओळख देतील याची शाश्वती नाही, पैसा कमवायचं तर दुरच
राहिलं (धनराज पिल्लेला विचारा)
मी : मला काही तुझे पटत नाही. आज मीराबाई संपूर्ण तरुण पिढीची आदर्श
आहे, प्रेरणा आहे.
ती : कसली प्रेरणा आणि कसलं काय?
त्या मणिपूरच्या खेड्यात तिच्या आई वडीलांना आयटी क्षेत्र किंवा करिअरच्या विविध
संधी काय असतात हेच माहित नव्हत. त्यात मुलगी. म्हणून त्यांनी चालू दिले असणार. आपल्या
पुण्या-मुंबईत सुशिक्षित मिडलक्लास मधील किती आया आणि बाप यातून प्रेरणा घेऊन स्वत:च्या
मुलाला सांगतील कि तू कॉम्पुटर कोडींग शिकायच्या ऐवजी धावणे, गोळाफेक, उंच उडी,
लांब उडी किंवा वेट लिफ्टिंग मध्ये जास्त इंटरेस्ट घे? कारण त्यात पैसा नाही.
शहरातल्या संस्कृतीत ज्यात पैसा नाही ते करिअर नाही.
मी : अरे असे नाही.... आज किती तरी
जण...
ती : ‘किती तरी’ पेक्षा नेमके कोण? तर इंजिनिअर, डॉक्टर किंवा बिझनेसमन होण्याची
आर्थिक किंवा बौद्धिक परिस्थिती नसलेले... किंवा योग्य मार्ग-संधी माहितीच नसलेले...
गावाकडचे. ज्यांना अक्कल आहे ते गप्प कोडींग शिकतात. तू मला सांग ऑलिम्पिक मध्ये
भाग घेण्यासाठी जेव्हडे कष्ट, चिकाटी वगैरे जे काही लागते तेच कष्ट, तीच जिद्द एखाद्या
चांगल्या करिअर मध्ये म्हणजे कोडींग, सोफ्टवेअर यांपासून गेला बाजार सोफ्टस्कील
किंवा लाईफकोच पर्यंत अनेक पर्यायांमध्ये वापरली तर कित्येक पटींनी जास्त श्रीमंत व
आरामदायी आयुष्य मिळणार.
मी : अरे पण खेळातला आनंद....
ती : गप रे... पदक जिंकून काही होत नाही. इतर बर्याच गोष्टींची काळजी
घ्यावी लागते (सुशील कुमारला विचारा). आणि कसे आहे.... धावण्यात आणि उड्या
मारण्यात जो पहिला येतो त्याच्याच खायची-प्यायची सोय होवू शकते. कोडींग, इम्पोर्ट-एक्स्पोर्ट,
एम्बिए मध्ये आपण पहिल्या दहा हजारात आलो तरी ऐशोआराम नक्की.
मी :पैसे मिळविणे म्हणजेच यशस्वी करिअर असे नसते.
ती :ते इतरांसाठी. स्वत:च्या मुलांसाठी नाही. अथ्लेटीक्स मध्ये पैसा
नाही म्हणून ते करिअर असूच शकत नाही. म्हणूनच घरातील कर्ता पुरुष जर अथ्लेटीक्स मधे
करिअर करत असेल तर त्याला न
मिळालेल्या शहरातील opportunities हेच त्यामागचे कारण असते. एकवेळ
बाप किंवा पतीच्या पाठींब्यावर महिला अथ्लेटीक्स चालून जातंय.
मी : हे जरा अतीच झाले.
ती : मग मला दहा पुरुष खेळाडू सांग ज्यांच्यावर पिक्चर आलेला नाही आणि जे
अथ्लेटीक्स मधून लौकिकार्थाने चारीथार्थ चालवितात.
मी : मोहिंदर सिंग गिल, अब्दुल
कुरेशी, ..... सीमा पुनिया?
ती : पाहिलं कोणालाही माहित नाही. खेळायचेच असेल तर क्रिकेट खेळा... तेही
पुरुष असाल तरच...
मी : असे काय... मिताली राज बघ
की.... अभिमानास्पद करिअर आणि वल्ड रेकोर्ड ...
ती : जाहिराती किती मिळतात? उत्पन्न किती? असेच करिअर पुरुष म्हणून असते
तर आर्थिक परिस्थिती वेगळी असती कि नाही? स्पोर्ट्स मध्ये महिला brand किंवा मॉडेल
होवूच शकत नाहीत.
मी : काही काय... सानिया मिर्झाला
किती जाहिराती मिळाल्या होत्या....
ती : हो! बाईला जाहिराती साठी नुसते आदर्श टेनिस खेळून चालत नाही त्यासाठी
मॉडेलसारखे दिसावे सुद्धा लागते.
मी : ते ही खरे आहे! मॉडेलींग वाईटच!! म्हणून मी माझ्या नात्यातल्या सर्व
विद्यार्थ्यांना कोडींगच शिकायला सांगणार आहे. आणि वैदिक गणित. त्याचा फायदा होतो
म्हणे कोडींग मध्ये. मॉडेलिंग, राजकारण असल्या डोक्याला कटकटीच नकोत. पाच दिवस काम
आणि मस्त विकेंड. शेवटी करिअर जीवनाचा एक भाग असतो, आख्ख आयुष्य नाही.
ती : समजलं ना.... आयुष्यात प्रोफेशनल म्हणजे व्यवसाईक होता आले पाहिजे...
मी : खरे आहे... व्यवसाइकता
पाहिजे...
ती : करेक्ट आहे! धंदेवाइकता
पाहिजे.... !
© स्वरूप गोडबोले